आपला जिल्हाताज्या घडामोडी

शिवसेनेचे रेती माफिया–प्रशासन संगनमताचा गंभीर आरोप

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात ९ जून २०२६ पासून सर्व रेतीघाट अधिकृतरीत्या बंद करण्याचे आदेश असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन, साठेबाजी आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महसूल मंत्री आणि रेती माफिया यांच्या संगनमतामुळे हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी पत्रकार परिषदेत केला.

पवन गेडाम म्हणाले की, शासनाच्या आदेशानुसार रेतीघाट बंद असतानाही अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून अवैध उत्खनन सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने रेती माफियांचे मनोबल वाढले असून, त्यामुळे शासनाच्या आदेशालाच हरताळ फासला जात आहे.

अवैध उत्खननामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या दोन ते अडीच महिन्यांत अवैध रेती उत्खननामुळे दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोंडाळा येथील सिनराई रेतीघाटावर मोठ्या लोडर यंत्रांच्या साहाय्याने सुरू असलेल्या उत्खननादरम्यान एका मजुराचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनांनंतर संबंधित प्रकरणे आर्थिक तडजोडीत दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा तसेच शवविच्छेदन प्रक्रियेबाबतही संशय निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

प्रशासनावर गंभीर आरोप; राजीनाम्याची मागणी

केवळ कनिष्ठ महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून वरिष्ठ अधिकारी जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत पवन गेडाम यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि महसूल मंत्र्यांवर थेट निशाणा साधला. शहरातून ओव्हरलोड रेती वाहतूक करणारी वाहने खुलेआम फिरत असताना प्रशासन मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधितांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नसेल, तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पर्यावरण आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान

अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रांचे नैसर्गिक संतुलन बिघडत असून भूजल पातळीवर परिणाम होत आहे. जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून ओव्हरलोड वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने करदात्यांच्या पैशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आठ दिवसांचा अल्टिमेटम

अवैध रेती उत्खनन व वाहतुकीची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच, येत्या आठ दिवसांत अवैध रेती व्यवसाय पूर्णपणे बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पवन गेडाम यांनी दिला.

पत्रकार परिषदेला डॉ. श्रीकांत बनसोडे, नंदू कुमरे, विलास ढोबरे, मनोज पोरटे, विलास ठाकरे, पप्पू शेख, गोविंदा ब्राह्मणवाडे, वैभव सातपुते, नैताम तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker