आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय
शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन; विनायक राऊत यांचे सरकारवर टीकास्त्र
गडचिरोलीत शिवसेना (उबाठा)चे संघटन मजबूत करण्याचा निर्धार

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गडचिरोली जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा तसेच भव्य पदाधिकारी मेळावा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्ह्यातील तालुकाप्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गावपातळीपर्यंत संघटन मजबूत करणे, जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणे आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
त्यानंतर शिवसेना सचिव तथा माजी केंद्रीय मंत्री विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
गडचिरोलीतील प्रश्नांवर सरकारवर टीका
मार्गदर्शन करताना विनायक राऊत यांनी विद्यमान राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद असतानाही जिल्ह्यातील मूलभूत प्रश्न कायम असल्याचा आरोप त्यांनी केला.
जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. आश्रमशाळांमध्ये आवश्यक सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
गडचिरोलीतील वीजपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नावरही राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. “पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असलेल्या जिल्ह्यात थोडासा पाऊस आला तरी विद्युत प्रवाह खंडित होतो,” अशी टिप्पणी करत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने संघर्षाची भूमिका कायम ठेवावी आणि गावागावात कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संपर्क वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.




