गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या एकलव्य मॉडेल स्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदिवासी आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मोहन पुराम यांनी दिला आहे. यासंदर्भात शिष्टमंडळाच्या वतीने प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून एकलव्य मॉडेल स्कूल सुरू करण्यात आले आहे. या शाळांमध्ये CBSE पॅटर्नसह विविध अभ्यासक्रमांचा समावेश असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही योजना महत्त्वाची असल्याचे पुराम यांनी निवेदनात म्हटले आहे.
मात्र, नवीन इमारतीचे बांधकाम अद्याप संथ गतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंत्राटदारांच्या निष्क्रियतेमुळे इमारतींचे बांधकाम अपेक्षित वेळेत पूर्ण झाले नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होत असल्याची खंत पुराम यांनी व्यक्त केली.
पाणी, भोजन व सुविधांबाबतही तक्रारी
शाळेत पुरेसे व योग्य पिण्याचे पाणी, वापरासाठी पाण्याची सुविधा, भोजनाची गुणवत्ता तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांबाबत अडचणी असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या सुविधांच्या अभावाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पुराम यांनी म्हटले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुढील शैक्षणिक सत्रापासून एकलव्य मॉडेल स्कूल नवीन इमारतीत स्थलांतरित करावे आणि बांधकामाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मोहन पुराम व नंदुभाऊ नरोटे, सरसेनापती आविस यांनी दिला.
या शिष्टमंडळात दीपक कोकोडे, नानाजी उसेंडी, धनपाल गेडाम, भूमिका सिडाम, रेखा कोवे, गुलाब सेडमाके, सुरेश तुलावी, दिनेश फुलकवर, फाल्गुन उसेंडी, उमेश्वर पंधरे, चंद्रभान कोवाची आदींचा समावेश होता.
Back to top button