गडचिरोली,प्रतिनिधी :-
जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न येत्या दोन महिन्यांत मार्गी लावा, अन्यथा जिल्हाभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देत प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
गडचिरोली हा आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्हा असूनही येथील नागरिकांना आजही अनेक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे शिवसेनेने निवेदनातून निदर्शनास आणून दिले. आदिवासी बांधवांचे प्रलंबित वनहक्क पट्टे तातडीने वितरित करावेत, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त पदे भरावीत आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
शेतकरी, रस्ते आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा, मुरूमगाव-धानोरा-गडचिरोली मार्गासह जिल्ह्यातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि आवश्यक ठिकाणी नवीन रस्त्यांची निर्मिती करावी, अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन त्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी भूमिका शिवसेनेने मांडली.
दोन महिन्यांची मुदत; अन्यथा जिल्हाभर आंदोलन
जिल्ह्यातील प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे, अशी भूमिका जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी मांडली. शासनाने येत्या दोन महिन्यांत मागण्यांवर ठोस निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावेत. अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडून चक्काजाम करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.
यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ. बनसोड, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, विधानसभा संघटक नंदूभाऊ कुमरे, माजी जिल्हा संघटक विलास ठोंबरे, तालुकाप्रमुख मनोज पोर्टे, गणेशामजी कोलते, गोविंदाजी ब्राह्मणवाडे, संतोष लोणबले, किरण शेडमाके, विलास ठाकरे, आशिष काडे, सदाशिव गाणे, पिल्लारे, काळबांडे, महिला आघाडीच्या विनुताई ढवगाडे, युवासेना जिल्हाप्रमुख गुणाजी भोरकुटे, उपजिल्हाप्रमुख चेतन उरकुडे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव सातपुते, शहरप्रमुख अमोल कुडमेते, अतुल नैताम, तुषार मडावी यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
जिल्ह्यातील आदिवासी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेनेचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार पवन गेडाम यांनी व्यक्त केला.
Back to top button