आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजीक

गडचिरोली आगारात लोकार्पण व पूजन सोहळा; ई-चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन, चार प्रमुख मार्गांवर धावणार

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, आरामदायी आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. गडचिरोली एसटी आगारात १५ अत्याधुनिक ‘शिवाई इलेक्ट्रिक’ बसेस दाखल झाल्या असून, गुरुवारी गडचिरोली बसस्थानक येथे या बसेसचा लोकार्पण व पूजन सोहळा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते पार पडला. यासोबतच इलेक्ट्रिक बसेसच्या संचालनासाठी उभारण्यात आलेल्या ई-चार्जिंग स्टेशनचेही उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बसेस उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

नागपूर, चंद्रपूरसह अहेरी आणि मुरुमगाव मार्गावर धावणार

गडचिरोली आगारात दाखल झालेल्या या १५ इलेक्ट्रिक बसेस गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चंद्रपूर, गडचिरोली-अहेरी आणि गडचिरोली-मुरुमगाव या प्रमुख मार्गांवर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. इलेक्ट्रिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

ई-चार्जिंग स्टेशनमुळे संचालनाला मिळणार बळ

इलेक्ट्रिक बसेसच्या नियमित आणि सुरळीत संचालनासाठी गडचिरोली बसस्थानक परिसरात ई-चार्जिंग स्टेशनची सुविधा उभारण्यात आली आहे. त्यामुळे बसेसना आवश्यक चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार असून, जिल्ह्यात पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, भाजयुमोचे हरिश माकडे, शुभम बाळेकरमकर, यश कोंडावार, सतीश पेंडोरकर, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सनियंत्रण समिती क्रमांक ३ चे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभने, प्रादेशिक अभियंता महेंद्रकुमार नेवारे, गडचिरोली विभागाचे विभाग नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडस्कर, यंत्र अभियंता छगन डिवसे, विभागीय वाहतूक अधिकारी कन्हैया भोगे आणि गडचिरोली आगार व्यवस्थापक सचिन नेवारे उपस्थित होते.

१५ इलेक्ट्रिक बसेस आणि ई-चार्जिंग स्टेशनच्या सुविधेमुळे गडचिरोलीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाला चालना मिळणार असून, जिल्ह्यातील प्रवाशांना पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker