आपला जिल्हाताज्या घडामोडी

नाट्यगीत, अभंग, भावगीत आणि सामुदायिक ध्यानाने रंगली ‘दिवाळी भजन पहाट’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त भक्तिमय व सांगीतिक कार्यक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-

दिवाळीचे औचित्य आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोलीत सामुदायिक ध्यान व ‘दिवाळी भजन पहाट’ हा भक्तिमय सांगीतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. नाट्यगीत, अभंग, भक्तिगीते, भावगीते आणि देवीच्या गोंधळाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

श्री गुरुदेव योग शिक्षण व सेवा समिती, नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ आणि राजवी प्रॉडक्शन, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी रोडवरील कमलकेशव सभागृह, कात्रटवार लॉन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे सामुदायिक ध्यानाने झाली. त्यानंतर डॉ. उमेश समर्थ, राजेश कात्रटवार, सुनील चडगुलवार, वामनराव सावसाकडे, लिंगाजी मोरांडे, सुरेश भांडेकर, मनोज सिंह पवार आणि मंगेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी मनश्री महाजोके हिने मार्गदर्शन केले.

‘सादर करतो कला गजमुखा’ या नांदीने सांगीतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वरबहार दिवाकर बारसागडे यांनी ‘जयोस्तुते उषा देवते’ (मानापमान), ‘घेई छंद मकरंद’ (कट्यार काळजात घुसली), ‘कर हा करी धरीला शुभांगी’ (संशयकल्लोळ) आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाचे सादरीकरण करून रसिकांची दाद मिळवली.

शुभांगी डाहुले यांनी भक्तिगीते, भावगीते आणि देवीचा गोंधळ सादर केला. गिरीधर दोनाडकर आणि रजनीकांत गुरुनुले यांनीही भजनांचे सादरीकरण केले. बालगायक रुद्र झोडगे, आसावली ठोंबरे, नुपूर वनकर आणि हिरकणी इंगोले यांनी गीतगायनातून कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मुक्तावरम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ दैवलकर, नामदेवराव ईजनकर, अनिकेत गेडाम, बाबा नक्षिने आणि स्नेहल नक्षिने यांनी सहकार्य केले. सामुदायिक ध्यान आणि विविध संगीत प्रकारांच्या सादरीकरणातून दिवाळीची पहाट भक्तिमय वातावरणात उजळून निघाली.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker