गडचिरोली, प्रतिनिधी :-
लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने येत्या २९ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथे ‘जनता अवेक इंडिया’ राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. लोकसंघ – सोशल एज्युकेशन मूव्हमेंटच्या वतीने होणाऱ्या या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी बळीराजा पॅलेस येथे नियोजन बैठक पार पडली.
महामानवांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढे नेणे, समाजात चिकित्सक विचार, लोकशिक्षण आणि संवैधानिक मूल्यांवर आधारित संवादाची संस्कृती विकसित करणे, तसेच देशातील समकालीन प्रश्नांवर विचारमंथन घडवून आणणे, हा संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.
या राज्यस्तरीय संमेलनात देशभरातील विचारवंत, अभ्यासक, लेखक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. लोकशाही, संविधान, सामाजिक न्याय, आदिवासी अधिकार, शिक्षण, युवकांचे प्रश्न तसेच ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त आणि इतर वंचित समाजघटकांच्या प्रश्नांवर विविध वैचारिक सत्रांच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी ‘आम्ही भारताचे लोक’ ही संवैधानिक भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या संमेलनातून केला जाणार आहे.
वैचारिक मंथनासोबत परिवर्तनवादी सांस्कृतिक जलसा
संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांवर आधारित सांस्कृतिक जलसा. महाराष्ट्रातील विविध भागांतील कलावंत परिवर्तनवादी गीते, लोककला, रॅप आणि विविध कलाप्रकारांतून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणार आहेत. त्यामुळे वैचारिक चर्चा आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचा संगम अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.
याशिवाय संमेलनस्थळी पुस्तक प्रदर्शन व विक्री, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व सहाय्य, उच्च शिक्षण व करिअर मार्गदर्शन, पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि अन्य उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे, परिवर्तनवादी साहित्य लोकांपर्यंत पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधींबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमांचा हेतू आहे.
नियोजन बैठकीत संमेलनाचे स्वरूप, वैचारिक सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, निमंत्रित वक्ते, नोंदणी व्यवस्था, प्रचार-प्रसार आणि आयोजनाच्या विविध जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला ॲड. बोधी रामटेके, देवेंद्र सोनपिपरे, अन्नपूर्णा सिडाम, विनोद मडावी, धर्मानंद मेश्राम, शाम रामटेके, संतोषी सूत्रपवार, तनुज पेंदोर, ॲड. नभा शेंडे, संचाली गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील विचारवंत, लेखक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी यमुना लॉन, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकसंघ – सोशल एज्युकेशन मूव्हमेंटच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतची माहिती ॲड. नभा शेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Back to top button