आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचिरोलीत ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’

राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती, आरोग्य, शासकीय सेवा आणि आदिवासी सक्षमीकरणाचे उपक्रम राबविण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या शासन परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

या सप्ताहातील १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे राज्यस्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे शासनाच्या कार्यक्रम रूपरेषेत नमूद करण्यात आले आहे.

शासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार ११ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हा मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे. १२ नोव्हेंबर रोजी अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन होईल. १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आणि प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभांचे वितरण, महिला बचत गटांना मदत तसेच स्वयंरोजगार व आर्थिक स्वावलंबनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

१४ नोव्हेंबर रोजी आदिवासी स्मारकांची स्वच्छता, देखभाल आणि दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करून जयंती साजरी केली जाणार आहे. यासोबतच आदिवासी समाजातील मान्यवर, समाजसेवक, सामाजिक नायक आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. गडचिरोली येथे भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करण्याचाही उल्लेख शासनाच्या कार्यक्रमात आहे.

१६ नोव्हेंबर रोजी आधार कार्ड दुरुस्ती, वनपट्टाधारकांना विविध लाभांचे वितरण, शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक ऑनलाइन सेवांचे मार्गदर्शन करणारे सेवा शिबिर आयोजित केले जाईल.

१७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरात रक्तदाब, मधुमेह यांसह प्राथमिक आरोग्य तपासणी, सिकलसेल आजाराबाबत जनजागृती, माता-बाल आरोग्य आणि पोषणविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच स्थानिक पौष्टिक तृणधान्ये, कडधान्ये व पारंपरिक अन्नपिकांचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

१८ नोव्हेंबर रोजी आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन आणि सप्ताहाचा समारोप होईल. यावेळी महिला बचत गट, स्वयंरोजगार, कृषी, पशुसंवर्धन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, जात वैधता, व्यावसायिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक परंपरा, लोककला, लोकनृत्य आणि पारंपरिक ज्ञानाला प्रोत्साहन देण्यावरही शासनाने भर दिला आहे. सर्व शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या सप्ताहाचे विशेष महत्त्व असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker