गडचिरोली, प्रतिनिधी :-
साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स, वाकडी येथील कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, संस्थेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य अमिता शामकांत मडावी यांनी पत्रकार परिषदेत केली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित सुधाकर साळवे यांनी शासकीय पदाचा गैरवापर करून खासगी नर्सिंग संस्था स्थापन केल्याचा तसेच आवश्यक सुविधा नसताना १०० खाटांच्या रुग्णालयाचे नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप मडावी यांनी केला. प्रत्यक्षात संस्थेकडे आवश्यक रुग्णालयीन सुविधा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग तसेच आवश्यक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्याचा त्यांचा दावा आहे.
नर्सिंग विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी आवश्यक परवानग्या आणि मान्यतांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात यापूर्वी शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या असून, आरोग्य सेवा संचालनालयाने ३१ जुलै २०२६ रोजी डॉ. साळवे यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, चौकशी प्रक्रियेवर संबंधित अधिकाऱ्यांचा प्रभाव पडू नये आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी डॉ. अमित साळवे यांना तात्काळ निलंबित करून त्यांचे मुख्यालय गडचिरोली जिल्ह्याबाहेर ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित नर्सिंग संस्थेच्या मान्यतेची आणि रुग्णालय नोंदणीची तपासणी करून दोषींवर फौजदारी व विभागीय कारवाई करावी, अशीही मागणी केली.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही अमिता मडावी यांनी दिला.
Back to top button