आष्टी, प्रतिनिधी :-
आष्टी तालुका निर्मितीच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळाला असून, शासनाच्या प्रस्तावित तालुक्याच्या यादीतून आष्टीचे नाव वगळल्याच्या निषेधार्थ सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी आष्टी बंदची हाक देण्यात आली आहे. आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असून, सकाळी ९ वाजल्यापासून संपूर्ण आष्टी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या ४० वर्षांपासून आष्टी तालुका निर्मितीसाठी विविध स्तरांवर संघर्ष सुरू आहे. शासनाच्या प्रस्तावित अपर तालुक्यांमध्ये आष्टीचा समावेश करण्यात आला होता. मात्र, २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन आदेशात आष्टीचे नाव वगळण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
रद्द करण्यात आलेल्या आष्टीच्या समावेशाचा निर्णय पुन्हा बदलून आष्टीचा तालुक्यात समावेश करावा, या मागणीसाठी संघर्ष समितीने बंदचे आवाहन केले आहे.
या बंदमध्ये व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक तसेच सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपली दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन आष्टी तालुका निर्मिती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या तालुका निर्मितीच्या मागणीला या आंदोलनातून पुन्हा एकदा व्यापक जनसमर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Back to top button