क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचिरोलीत रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये २७ टक्क्यांची घट!

नऊ महिन्यांत ३३ मृत्यू कमी; वेग नियंत्रण, वाहतूक तपासणी आणि रस्ते सुरक्षा उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत जिल्ह्यात अपघाती मृत्यूंची संख्या १२१ वरून ८८ वर आली असून, गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभागाने केलेल्या प्रयत्नांमुळे हा सकारात्मक बदल दिसून आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली.

 नऊ महिन्यांत ३३ मृत्यू कमी

महाराष्ट्रातील सप्टेंबर २०२६ अखेरच्या रस्ते अपघातांच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात १२१ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. यंदा याच कालावधीत ही संख्या ८८ वर आली. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत ३३ मृत्यू कमी झाले आहेत. सन २०२४ च्या याच कालावधीत जिल्ह्यात ११८ जणांचा मृत्यू झाला होता.

 वेग नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी जिल्हाभरात १५ ‘डायनॅमिक स्पीड इंडिकेटर’ बसविण्यात आले आहेत. वाहनांचा वेग दर्शविणाऱ्या या यंत्रणांमुळे चालकांना वेगमर्यादेची जाणीव करून देण्यास मदत होत आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून अतिरिक्त ४० पोलीस अंमलदार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

याशिवाय, अपघातप्रवण ३४ ठिकाणी रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने दुरुस्ती व सुधारणा करण्यात आल्या असून, वाहतूक सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहन तपासणीदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना अंगावर परिधान करता येणारे ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 नियमभंग करणाऱ्यांवर विशेष तपासणी

वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या समन्वयातून वाहतूक नियमांची अंमलबजावणी आणि अपघात प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा केला, अशी माहिती किरण मोरे यांनी दिली.

राज्याच्या तुलनेत गडचिरोलीची घट अधिक

राज्यस्तरीय आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्रात रस्ते अपघातांत ११ हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२६ मध्ये याच कालावधीत ही संख्या ११ हजार ३२६ झाली. राज्यात मृत्यूंच्या संख्येत सुमारे पाच टक्के घट झाली असताना गडचिरोली जिल्ह्यात २७ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

प्रशासकीय उपाययोजनांबरोबरच वाहनचालकांनीही रस्ते सुरक्षेची जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावावा, वेगमर्यादेचे पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

अपघाती मृत्यूंच्या संख्येत झालेली घट दिलासादायक असली, तरी रस्ते सुरक्षा उपाययोजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांद्वारे अपघातांचे प्रमाण आणखी कमी करण्याचे आव्हान कायम आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker