वडसा, प्रतिनिधी :-
पशुधनासाठी सकस चारा उपलब्ध व्हावा, चारा टंचाईवर मात करता यावी आणि पशुखाद्यावरील खर्च कमी व्हावा, या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती वडसा यांच्या वतीने चारा साक्षरता अभियानांतर्गत वाळलेल्या तनिसावर युरिया प्रक्रिया करून निकृष्ट चारा सकस करण्याबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी डॉ. अतुल ढोक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात पशुपालकांना वाळलेल्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत समजावून सांगण्यात आली. तसेच प्रक्रिया करताना घ्यावयाची खबरदारी आणि प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात योग्य वापर कसा करावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे युरिया प्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.
ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या वाळलेल्या चाऱ्यावर योग्य प्रक्रिया केल्यास त्याचा उपयोग अधिक प्रभावीपणे करता येतो. विशेषतः चारा टंचाईच्या काळात पशुधनासाठी सकस चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आणि पशुखाद्यावरील खर्च कमी करणे यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे पशुपालकांनी युरिया प्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब करताना शास्त्रीय पद्धतीचे पालन करावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. पूनम गणवीर, पशुधन विकास अधिकारी, भूपेंद्र मेश्राम, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, ईश्वर नागोसे, प्रणय नागोसे यांच्यासह तालुक्यातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पशुपालकांमध्ये शास्त्रीय चारा व्यवस्थापनाविषयी जागरूकता निर्माण करणे, उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर वाढविणे आणि पशुसंवर्धन व्यवसाय अधिक किफायतशीर बनविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
Back to top button