मुंबई, प्रतिनिधी :-
महाराष्ट्रातील माओवादविरोधी लढ्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या सी-६० दलाचे संस्थापक के. पी. रघुवंशी (भा.पो.से., सेवानिवृत्त) यांचा पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात १ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्मान करण्यात आला. गडचिरोली परिक्षेत्रात यापूर्वी सेवा बजावलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्हा मे २०२६ मध्ये सशस्त्र माओवादी कॅडरपासून मुक्त झाल्याचे या वार्तापत्रात नमूद करण्यात आले असून, सध्या महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या परिवर्तनाच्या वाटचालीची मुहूर्तमेढ सन १९९० मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक के. पी. रघुवंशी यांनी रोवली.
६० जवानांपासून सी-६०ची स्थापना
गडचिरोलीतील कठीण भौगोलिक परिस्थिती आणि माओवादी आव्हान लक्षात घेऊन १ डिसेंबर १९९० रोजी केवळ ६० निवडक जवानांसह सी-६० दलाची स्थापना करण्यात आली. स्थानिक भूभागाची माहिती असलेल्या तसेच गोंडी व माडिया भाषा जाणणाऱ्या स्थानिक युवकांना दलात सहभागी करून माओवाद्यांविरुद्ध त्यांच्या परिसरातच प्रभावी लढा देण्याची संकल्पना रघुवंशी यांनी मांडली.
सन १९९४ मध्ये दक्षिण गडचिरोलीसाठी दलाची दुसरी शाखा निर्माण करण्यात आली. आज गडचिरोलीत सी-६०ची २९ पथके आणि ९६१ जवान, तर गोंदियात ९ पथके व १६६ जवान कार्यरत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या दलाला ड्रोन, एमपीव्ही, बीडीडीएस व श्वान पथकांचेही पाठबळ आहे.
चार दशकांच्या संघर्षाला निर्णायक वळण
पोलिसांच्या माहितीनुसार, माओवादविरोधी लढ्यात महाराष्ट्रात आतापर्यंत २४४ पोलीस अधिकारी व जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले, तर ६०९ नागरिकांचा माओवाद्यांकडून मृत्यू झाला. या काळात ३६३ माओवादी ठार, ५५८ अटक आणि ८६१ जणांनी आत्मसमर्पण केल्याचे वार्तापत्रात नमूद आहे.
२०१८ मधील बोरिया-कसनासूर, २०२१ मधील मर्दिनटोला आणि २०२४ मधील वांढोली चकमक या माओवादविरोधी अभियानातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी ठरल्या. २०२६ च्या सुरुवातीला फोदेवाडा परिसरातील अभियानात माओवादी कमांडर प्रभाकर याचा मृत्यू झाल्यानंतर माओवादी चळवळीला आणखी एक निर्णायक धक्का बसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
‘ऑपरेशन अंतिम प्रहार’नंतर माओवादमुक्तीचा दावा
मे २०२६ मध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागात विशेष शोध अभियान राबविण्यात आले. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत आठ माओवाद्यांना अटक करण्यात आली, तर पाच जणांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या अभिलेखावर एकही सक्रिय सशस्त्र माओवादी शिल्लक नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ८१९ सशस्त्र माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा मार्ग स्वीकारला, अशी माहितीही देण्यात आली. आत्मसमर्पितांच्या पुनर्वसनासाठी ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून १५३ भूखंडांचे वाटप करण्यात आले असून, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींशी त्यांना जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सी-६० जवानांना शौर्य पुरस्कार
सी-६० दलाच्या अधिकारी व जवानांना आतापर्यंत ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती शौर्य पदके, ३५८ पोलीस शौर्य पदके आणि २२ राष्ट्रपती पोलीस पदके मिळाल्याचे वार्तापत्रात नमूद आहे. तसेच २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रथमच ‘सी-६० सेवा पदक’ जाहीर केले असून, गडचिरोली पोलीस दलातील ४२५ अधिकारी व जवानांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे.
विकासकामांनाही गती
माओवादमुक्तीनंतर शांतता कायम ठेवण्यासाठी पोलीस दलाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ‘पोलीस दादालोरा खिडकी’, ‘प्रोजेक्ट उडान’, ‘प्रोजेक्ट उत्थान’ आणि ‘प्रोजेक्ट कृषी समृद्धी’च्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क वाढविण्यात येत आहे.
‘प्रोजेक्ट उडान’द्वारे १६,३४३ युवकांना रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी १०,७३० युवकांना रोजगार मिळवून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच दुर्गम भागात ७५ वाचनालये आणि ८७ गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच बससेवा पोहोचल्याचे पोलिसांनी नमूद केले. पोलीस दलाच्या सुरक्षा व सहकार्यामुळे जिल्ह्यात ४२३ किलोमीटर रस्ते, ६५ पूल आणि ६२८ मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
रघुवंशी यांच्या योगदानाचा गौरव
सन्मान सोहळ्यात पोलीस महासंचालकांनी १९९० मध्ये ६० जवानांपासून सुरू झालेल्या सी-६० दलाच्या वाटचालीचा गौरव केला. रघुवंशी यांच्या संकल्पनेला पुढे नेणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी, जवान तसेच सीआरपीएफ व एसआरपीएफ दलांच्या योगदानाचेही यावेळी स्मरण करण्यात आले.
माओवादविरोधी लढ्यात बलिदान दिलेल्या २४४ शहीद पोलीस अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सी-६० दलाच्या कामगिरीचा आणि प्राप्त शौर्य व गुणवत्तापूर्ण सेवा पुरस्कारांचा आढावा सादर केला.
गडचिरोली परिक्षेत्रात यापूर्वी सेवा बजावलेल्या माजी पोलीस अधीक्षकांनीही सी-६०च्या वाटचालीतील अनुभव आणि आठवणी यावेळी उपस्थितांसमोर मांडल्या.
Back to top button