गडचिरोली, प्रतिनिधी :-
माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने गर्देवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात जमिनीत पुरून ठेवलेला शस्त्रसाठा, स्फोटक साहित्य आणि इतर माओवादी साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या विशेष शोधमोहिमेत दोन अग्निशस्त्रे, ३१ जिवंत काडतुसे, तीन ग्रेनेड, १८ बीजीएल सेल आणि अन्य साहित्य हस्तगत करण्यात आले.
माओवाद्यांकडून पूर्वी दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत शस्त्रे व स्फोटक साहित्य तयार करून ते गुप्तपणे जमिनीत लपवून ठेवले जात असे. नक्षल सप्ताह, निवडणुका तसेच अन्य प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात घडविण्यासाठी या साहित्याचा वापर केला जात असल्याची पार्श्वभूमी आहे.
गर्देवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिक्केर जंगल परिसरात माओवाद्यांनी स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिती येथील पाच तुकड्या आणि बीडीडीएसची दोन पथके शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आली. जंगल परिसराची कसून तपासणी केली असता जमिनीत लपवून ठेवलेला साहित्यसाठा आढळून आला.
या कारवाईत १२ बोर रायफल एक, एअरगन रायफल एक, .३०३ जिवंत काडतुसे १३, ८ एम.एम. जिवंत काडतुसे १८, ग्रेनेड तीन, बीजीएल सेल १८, बीजीएल लॉन्चर दोन, डेटोनेटर १०, सुराका सेल २१, होंडा कंपनीचे इलेक्ट्रिक जनरेटर एक, वायरचे २२ बंडल तसेच मोठ्या प्रमाणात इतर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली पार पडली. विशेष अभियान पथक गडचिरोली, प्राणहिती, इंटेलिजन्स सेल तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सहभागी जवानांचे कौतुक केले. जंगलात लपवून ठेवलेला शस्त्र व स्फोटक साहित्याचा साठा हस्तगत झाल्याने संभाव्य घातपाती कारवाया रोखण्याच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.
Back to top button