ताज्या घडामोडीदेश विदेश

जनजातीय गौरव दिवस’ नव्हे, ‘जागतिक आदिवासी गौरव दिवस’ म्हणा!

शब्दप्रयोगावरून आदिवासी समाजात नाराजी; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांचा निषेध

गडचिरोली, प्रतिनिधी :-

आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक ओळखीचा, मूळ निवासी असण्याच्या अस्मितेचा आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान राखण्यासाठी ‘जनजातीय गौरव दिवस’ या शब्दप्रयोगाऐवजी ‘जागतिक आदिवासी गौरव दिवस’ असा शब्दप्रयोग करण्यात यावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी केली आहे. ‘जनजातीय गौरव दिवस’ या नामकरणाबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी या शब्दप्रयोगाचा निषेध नोंदविला आहे.

आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी असून त्यांचा हजारो वर्षांचा इतिहास, समृद्ध संस्कृती, भाषा, कला, परंपरा आणि स्वतंत्र सामाजिक अस्तित्व हा भारतीय ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या गौरवाशी संबंधित दिवस साजरा करताना त्यांच्या मूळ ओळखीला साजेसा आणि सन्मान व्यक्त करणारा शब्दप्रयोग असणे आवश्यक आहे, असे पवन गेडाम यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, आदिवासी समाजाने पिढ्यान्‌पिढ्या आपली संस्कृती, परंपरा, भाषा आणि निसर्गाशी जोडलेली जीवनशैली जतन केली आहे. अशा समाजाच्या गौरवाचा दिवस ‘जागतिक आदिवासी गौरव दिवस’ म्हणून संबोधला असता, तर समाजाच्या ऐतिहासिक ओळखीला अधिक सन्मान मिळाला असता. मात्र, ‘जनजातीय गौरव दिवस’ या शब्दप्रयोगामुळे आदिवासींच्या मूळ निवासी असण्याच्या ऐतिहासिक ओळखीला अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

गौरव केवळ कार्यक्रमांपुरता नको, अस्मितेचाही सन्मान हवा

आदिवासी समाजाला केवळ गौरव दिनाच्या कार्यक्रमांपुरता सन्मान देणे पुरेसे नाही. त्यांच्या इतिहासाचा, अस्मितेचा, सांस्कृतिक अस्तित्वाचा आणि मूळ ओळखीचा आदर प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे. आदिवासी समाजाच्या नावाने कार्यक्रम आयोजित करताना त्यांच्या भावना आणि अस्मितेचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे गेडाम यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे शासन आणि संबंधित यंत्रणांनी आदिवासी समाजाच्या भावनांची गांभीर्याने दखल घेऊन ‘जनजातीय गौरव दिवस’ऐवजी ‘जागतिक आदिवासी गौरव दिवस’ असा सन्मानपूर्वक शब्दप्रयोग करावा, अशी मागणी पवन गेडाम यांनी केली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker