चामोर्शी, प्रतिनिधी :-
दुष्काळाच्या सावटात शेतकरी आत्महत्यांच्या दोन दुर्दैवी घटनांनी चामोर्शी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. कान्होली येथील दिवंगत शेतकरी अमोल दादाजी चौधरी आणि भेंडाळा येथील दिवंगत शेतकरी सचिन सातपुते यांच्या कुटुंबीयांची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमदार डॉ. मिलिंद सगुणाबाई रामजी नरोटे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. या कठीण प्रसंगी दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्द करून त्यांनी कुटुंबीयांना आधार दिला.
मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार आमदार डॉ. नरोटे यांनी प्रथम कान्होली येथे भेट देत दिवंगत अमोल चौधरी यांचे वयोवृद्ध वडील दादाजी तुकाराम चौधरी आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर भेंडाळा येथे जाऊन दिवंगत सचिन सातपुते यांच्या पत्नी अश्विनाताई सातपुते व कुटुंबीयांशी संवाद साधला. दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.
एका कुटुंबाचा कर्ता पुरुष हरपणे, तर वयोवृद्ध पित्याला स्वतःच्या मुलाच्या निधनाचे दुःख सहन करावे लागणे, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. सचिन सातपुते यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगी दोन्ही कुटुंबांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असून, त्यांना या संकटातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी भावना आमदार डॉ. नरोटे यांनी व्यक्त केली.
शेतकरी कुटुंबांवर संकट कोसळल्यानंतर केवळ सहानुभूती व्यक्त करून थांबणे पुरेसे नाही, तर अशा कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहून शक्य ती मदत करणे ही सामाजिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या भेटीदरम्यान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा ज्येष्ठ नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य राजेश्वर चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, भाजपा तालुका महामंत्री शेषराव कोहळे, संजय खेडेकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष भुवनेश्वर चौधरी, नरेश अलसावार, लछमाजी क्षीरगावार, रुपेश चौधरी, संजय चलाख, किशोर डांगे, गुरुदेव सातपुते, सचिन सातपुते, तुळशीराम जुवारे, संतोष सातपुते, विठ्ठल सातपुते, अल्काताई सातपुते, किशोर बुरे, बोंडकुजी बुरे, मनोहर नंदगिरवार, एकनाथ सातपुते, सुनील सातपुते, शुभाष चुनारकर, प्रलय सहारे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Back to top button