आपला जिल्हाताज्या घडामोडी
सफाई कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी; ‘स्वच्छतेच्या दूतां’चा सन्मान
नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्यासह नगरसेवकांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत घालवले आनंदाचे क्षण

गडचिरोली, प्रतिनिधी :-
शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर, नगरसेवक आणि सहकाऱ्यांनी दिवाळीचा सण साजरा केला. शहराच्या स्वच्छतेसाठी सातत्याने योगदान देणारे सफाई कर्मचारी हेच खरे ‘स्वच्छतेचे दूत’ असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आयोजित या उपक्रमात सफाई कर्मचाऱ्यांसोबत आनंदाचे क्षण घालवून त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहराला स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी हे कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच आपली खरी दिवाळी असल्याची भावना नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी व्यक्त केली.
या उपक्रमाला नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर, नगरसेवक सागर अरुण निंबोरकर, बांधकाम सभापती अनिल कुंजाळकर, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, नगरसेविका अवंती धंदरे, शिल्पा गव्हारे आदी उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याच्या या उपक्रमातून त्यांच्या श्रमाचा सन्मान आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.



