आपला जिल्हाताज्या घडामोडी

टव्वे जंगलात माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त

११ कुकर, गनपावडर, डेटोनेटरसह विविध साहित्य हस्तगत

गडचिरोली, प्रतिनिधी :-

माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील गॅरापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टव्वे जंगल परिसरात जमिनीत लपवून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने जप्त केले. ४ नोव्हेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष शोध अभियानादरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्फोटकांसाठी वापरण्यात येणारे ११ कुकर, गनपावडर, डेटोनेटर, वायर आणि अन्य माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले.

माओवाद्यांकडून यापूर्वी सुरक्षा दलांवर घातपाती कारवाया करण्यासाठी दुर्गम जंगल परिसरात शस्त्रास्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवले जात असे. या पार्श्वभूमीवर टव्वे जंगलात माओवादी साहित्य पुरून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता येथील चार तुकड्या तसेच बीडीडीएसची दोन पथके शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आली.

शोध अभियानादरम्यान बीडीडीएस पथकाने परिसराची कसून तपासणी केली असता जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य आढळून आले. त्यामध्ये ११ कुकर, कॉर्टेक्स वायरचे ३ बंडल (१०० फूट), ३ किलो गनपावडर, ४ डेटोनेटर, १२ व्होल्टची १ बॅटरी, २५० ग्रॅम फटाका दारू, ४ स्टील कंटेनर, वायरचे ८ बंडल, १ सोलर प्लेट आणि अन्य माओवादी साहित्याचा समावेश आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी या कारवाईत सहभागी जवानांचे कौतुक केले. माओवादाच्या प्रभावानंतर जिल्ह्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने जंगल परिसरात लपवून ठेवलेले साहित्य शोधून निष्क्रिय करण्यावर पोलीस दलाचा भर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker