आपला जिल्हाताजा खबरराजकीय

आज शिवसेनेचा जनआक्रोश मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा; कर्जमाफी, वनपट्टे, दुष्काळ जाहीर करणे आणि धानाला बोनस देण्यासह आठ प्रमुख मागण्या

गडचिरोली, प्रतिनिधी :-

शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख पवन राघोजी गेडाम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून, सकाळी ११ वाजता शिवसेना पक्ष कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे.

जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव, वनहक्कधारक, विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. विविध समस्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

मोर्चातील प्रमुख आठ मागण्या:-

– २००५ पूर्वीचे किंवा त्यानंतरचे वनअतिक्रमणधारक असोत, त्यांना सरसकट वनपट्टे देण्यात यावेत.

– संपूर्ण गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.

– शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करावे.

– स्मार्ट मीटर बसविण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

– धानोरा-मुरूमगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३० चे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे.

– गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील रिक्त पदे तातडीने भरावीत.

– शासकीय व आश्रमशाळांमधील निवासी सुविधांचा दर्जा सुधारावा.

– धानाला हमीभावाव्यतिरिक्त अतिरिक्त बोनस देण्यात यावा.

या मागण्यांबाबत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधून संबंधित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी आयोजित या जनआक्रोश मोर्चात शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव, वनहक्कधारक, विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख पवन राघोजी गेडाम यांनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker