ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
काँग्रेसशी चार दशकांची निष्ठा; रवींद्र दरेकर यांच्यावर नागपूर ग्रामीणची महत्त्वाची जबाबदारी
ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे विश्वासू सहकारी; विद्यार्थी चळवळीतून सुरू झालेला प्रवास आता जिल्हा प्रभारीपदापर्यंत
उदय धकाते
गडचिरोली :-
विद्यार्थी चळवळीतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करून काँग्रेस संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे रवींद्र दरेकर यांची नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या नियुक्तीपत्रानुसार त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रवींद्र दरेकर यांचा राजकीय प्रवास काँग्रेसप्रणीत भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूआय) मधून सुरू झाला. ज्ञानयोगी स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे ते विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. १९८० च्या दशकापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी संघटनात्मक कार्य सुरू ठेवले. राजकीय परिस्थिती बदलत असताना अनेकांनी पक्ष सोडला, मात्र दरेकर यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. त्यांच्या या दीर्घकालीन निष्ठेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर नागपूर ग्रामीण जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
युवक काँग्रेसच्या संघटनातून नेतृत्वाची ओळख
विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर दरेकर यांची युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्या वेळी ते सर्वात कमी वयातील युवा जिल्हाध्यक्ष ठरल्याचे सांगितले जाते. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि राष्ट्रीय स्तरावरील संघटनेतही त्यांनी काम केले.
निष्ठेच्या राजकारणाला मिळाली नवी जबाबदारी
दीर्घकाळ पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटनात्मक काम करणाऱ्या दरेकर यांच्याकडे नागपूर ग्रामीण जिल्ह्याची जबाबदारी सोपविणे, ही त्यांच्या राजकीय वाटचालीतील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग नागपूर ग्रामीणमधील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातून राजकीय प्रवास सुरू केलेल्या नेतृत्वाला शेजारच्या नागपूर ग्रामीण जिल्ह्यात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पक्षनिष्ठा, संघटनात्मक अनुभव आणि दीर्घकालीन राजकीय वाटचाल यांची दखल या नियुक्तीतून घेतल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.




