गडचिरोली, प्रतिनिधी :-
प्रादेशिक मौसम केंद्र, नागपूर यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात २८ ऑक्टोबर रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
२७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान पावसाचा अंदाज
२७ ऑक्टोबर रोजी येलो अलर्ट असून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट असून अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २९ ऑक्टोबरला पुन्हा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. ३० ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वीज पडण्यापासून बचावासाठी खबरदारी घ्या
मेघगर्जना व विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे. सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. झाडांखाली, विजेचे खांब, धातूच्या वस्तू आणि उघड्या जागांपासून दूर राहावे. पाण्यात असल्यास तातडीने बाहेर पडावे. तसेच विद्युत उपकरणे, पाण्याचे नळ आणि पाइपलाइन यांना स्पर्श करणे टाळावे.
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीकामांचे नियोजन करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा :-
दूरध्वनी : ०७१३२-२२२०३१ / २२२०३५
मोबाईल : ९४२३९११०७७ / ८२७५३७०५०८ / ८२७५३७०२०८
Back to top button