आपला जिल्हाआरोग्यताज्या घडामोडी

वन्यप्राणी हल्ल्यातील नुकसानभरपाईसाठी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांचा आरोप!

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर बडतर्फीची कारवाई करा; कुणाल पेंदोरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली, प्रतिनिधी :-

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या रुग्णांना गंभीर जखमी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पेंदोरकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून, या हल्ल्यांत जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले जाते. गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील जखमी रुग्णही येथे उपचारासाठी येतात. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किरकोळ दुखापत, गंभीर दुखापत किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्याच्या प्रकारानुसार वनविभागाकडून नुकसानभरपाई दिली जाते. त्यासाठी रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्राला महत्त्व असते.

 खोट्या प्रमाणपत्रांद्वारे शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रातील रेखा किरण मंडोगडे, शारदा मंगेश सोनटक्के, आशिष मंगेश सोनटक्के, उत्तम गोविंद मंडल, गडचिरोली तालुक्यातील चुरमुरा येथील कांताबाई वासुदेव डोंगरे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील दाबगाव येथील दादाजी काशिनाथ भोयर यांच्यासह इतर नागरिकांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याची माहिती निवेदनात नमूद आहे.

या प्रकरणांमध्ये काही रुग्णांना किरकोळ दुखापत झालेली असतानाही गंभीर जखमी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी आर्थिक लाभासाठी नियमबाह्य पद्धतीने प्रमाणपत्रे दिली, तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित खोट्या स्वाक्षऱ्या आणि तज्ज्ञांचा अभिप्राय न घेता प्रमाणपत्रे जारी केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पेंदोरकर यांनी केली आहे.

४५ हजार रुपये दिल्याचा उत्तम मंडल यांचा दावा

तक्रारकर्ते उत्तम मंडल यांनी गंभीर जखमी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पत्नीचे दागिने विकून त्यांनी डॉ. वर्षा लहाडे यांना ४५ हजार रुपये दिले. तरीही योग्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय, इतर काही नागरिकांनी गंभीर जखमी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी डॉ. वर्षा लहाडे आणि कनिष्ठ लिपिक वंदना लाडे यांच्याकडे प्रत्येकी ७० हजार रुपये दिल्याचा आरोपही तक्रारकर्त्यांनी केला आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.

 नुकसानभरपाईही नाही अन् पैसेही परत नाहीत!

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानभरपाईपोटी पाच लाख रुपये मिळतील, या अपेक्षेने काही रुग्णांनी कथितरीत्या मोठी रक्कम खर्च केली. मात्र, चार ते पाच महिने उलटूनही नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे. प्रमाणपत्रासाठी दिलेली रक्कम परत मिळविण्यासाठी संबंधितांशी संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे नुकसानभरपाई मिळाली नाही आणि प्रमाणपत्रासाठी खर्च केलेले पैसेही परत मिळाले नाहीत, अशा दुहेरी संकटात संबंधित रुग्ण सापडल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून वैद्यकीय प्रमाणपत्रे, संबंधित नोंदी आणि कथित आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच पात्र रुग्णांना नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी कुणाल पेंदोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker