गडचिरोली, प्रतिनिधी :-
सण, उत्सव, मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३८(१) अन्वये हा आदेश जारी केला असून, ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तो लागू राहणार आहे.
आदेशानुसार, सार्वजनिक ठिकाणी किंवा परिसरात ध्वनिक्षेपक, लाउडस्पीकर, ॲम्प्लिफायर अथवा अन्य ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी मिळाल्यानंतरही निर्धारित ध्वनीमर्यादा आणि परवानगीतील अटींचे पालन करावे लागणार आहे.
डीजे, वूफर, सबवूफरवर बंदी:-
डीजे, प्लाझ्मा सिस्टिम, मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट, वूफर आणि सबवूफर यांसारख्या अतितीव्र ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरास बंदी घालण्यात आली आहे. अशा ध्वनीमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी तसेच आजारी व्यक्तींवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत सक्त मनाई
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, लाउडस्पीकर, ॲम्प्लिफायर आणि इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करता येणार नाही. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी विहित केलेल्या दिवस व वेळांना यामधून अपवाद राहणार आहे.
ध्वनीची क्षेत्रनिहाय मर्यादा:-
आदेशानुसार ध्वनीमर्यादा पुढीलप्रमाणे आहे :
औद्योगिक क्षेत्र: दिवसा ७५, रात्री ७० डेसिबल
व्यावसायिक क्षेत्र: दिवसा ६५, रात्री ५५ डेसिबल
निवासी क्षेत्र: दिवसा ५५, रात्री ४५ डेसिबल
शांतता क्षेत्र: दिवसा ५०, रात्री ४० डेसिबल
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आणि शासनाने अधिसूचित केलेल्या शांतता क्षेत्रांमध्ये संबंधित ध्वनीमर्यादा व निर्बंधांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
उल्लंघन झाल्यास कारवाई
ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास पोलीस अधिकारी घटनास्थळी पाहणी करून कायद्यानुसार कारवाई करणार आहेत. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांची परवानगी रद्द करणे, ध्वनी उपकरणे जप्त करणे तसेच इतर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आदेशात करण्यात आली आहे.
त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या मंडळे, संस्था व आयोजकांनी ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Back to top button