आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षण
स्वर्गीय डॉ. शिवनाथ कुंभारे यांना ‘जीवनसाधना गौरव’ पुरस्कार मरणोत्तर प्रदान
पत्नी सुमन कुंभारे यांनी स्वीकारला सन्मान; विद्यापीठाचा भावपूर्ण गौरव

गडचिरोली, प्रतिनिधी :-
गोंडवाना विद्यापीठाच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्वर्गीय डॉ. शिवनाथ कुंभारे यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलेला हा सन्मान त्यांच्या पत्नी सुमन शिवनाथ कुंभारे यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. डॉ. कुंभारे यांच्या कार्याचा गौरव करणारा हा क्षण कार्यक्रमातील विशेष ठरला.
लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली हा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह विद्यापीठातील विविध प्राधिकरणांचे सदस्य, प्राध्यापक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कुंभारे यांच्या कार्याचा मरणोत्तर गौरव
‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ासाठी स्वर्गीय डॉ. शिवनाथ कुंभारे यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मानपत्राचे वाचन मराठी विभागप्रमुख डॉ. सविता गोविंदवार यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. कुंभारे यांच्या पत्नी सुमन कुंभारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला
याच पुरस्काराने डॉ. राजन पन्नालाल जयस्वाल यांनाही गौरविण्यात आले. त्यांनी पुरस्काराची रक्कम विद्यापीठाच्या गरीब विद्यार्थी निधीसाठी दान केली.
MPSC मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी नवी दिशा मिळणार आहे.
‘नवे मॉडेल’ म्हणून विद्यापीठ नावारूपास येईल : डॉ. अतुल वैद्य
यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कार्याचा गौरव केला. आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याचे विद्यापीठाचे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण आणि कौशल्य यांची सांगड घालून समाजाभिमुख विद्यार्थी घडविणाऱ्या उपक्रमांमुळे गोंडवाना विद्यापीठ ‘नवे मॉडेल’ म्हणून नावारूपास येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कौशल्ययुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण, मजबूत अर्थव्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे सांगितले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळविलेल्या विशाल मेश्रामचा सत्कार





