गडचिरोली, प्रतिनिधी :-
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक संकटातून दिलासा मिळावा, या सामाजिक बांधिलकीतून गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर आणि नगरसेवक सागर निंबोरकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा संकटाच्या काळात शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी समाजातील विविध घटकांनी उभे राहण्याची गरज आहे. हीच भावना लक्षात घेऊन ॲड. प्रणोती निंबोरकर आणि सागर निंबोरकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक योगदान देण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, आपल्या कष्टातून तो संपूर्ण समाजाचे भरणपोषण करतो. मात्र, निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे त्याच्यावर आर्थिक संकट ओढवते. अशा वेळी केवळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष मदतीचा हात देणे आवश्यक आहे, अशी भावना या देणगीमागे असल्याचे सांगण्यात आले.
सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेल्या २ लाख ५१ हजार रुपयांच्या योगदानातून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, हा उद्देश असल्याचे निंबोरकर दाम्पत्याने व्यक्त केला. त्यांच्या या पुढाकारातून सामाजिक संवेदनशीलता आणि शेतकरी बांधवांप्रती असलेली आत्मीयता अधोरेखित झाली आहे.
संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी समाजातील सक्षम घटकांनी पुढे यावे आणि शेतकरी कुटुंबांना आधार द्यावा, असा सकारात्मक संदेशही या उपक्रमातून देण्यात आला आहे.
Back to top button