गडचिरोली, प्रतिनिधी :-
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदी श्रीमंत संतोष सुरपाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
अनुसूचित जमाती समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासात्मक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणे, समाजातील नागरिकांना पक्षसंघटनेशी जोडणे आणि शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे, अशी जबाबदारी प्रदेश सदस्य म्हणून सुरपाम यांच्यावर राहणार आहे. तसेच संघटनात्मक विस्तार आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रदेश स्तरावर पाठपुरावा करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जमाती समाजाचे अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीत प्रदेश स्तरावर प्रतिनिधित्व मिळाल्याने जिल्ह्यातील समाजाच्या समस्या आणि मागण्या संघटनेच्या माध्यमातून मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नियुक्तीपत्र प्रदान करताना डॉ. देवराव होळी यांनी सुरपाम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्षाने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून समाजाच्या हितासाठी आणि संघटनात्मक बळकटीसाठी सक्रिय योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. नितीन कोडवते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी खासदार अशोक नेते, भाजपा महामंत्री प्रकाश गेडाम, डॉ. चंदा कोडवते, महामंत्री विनय मडावी आणि प्रमोद पिपरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या नियुक्तीबद्दल संतोष सुरपाम यांचे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात अनुसूचित जमाती समाजाच्या प्रश्नांसाठी आणि पक्षसंघटनेच्या विस्तारासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Back to top button