वरोरा,प्रतिनिधी :-
वरोरा येथील क्रीडा संकुलाची जागा मेळ्यासाठी देण्याच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने आता तीव्र स्वरूप धारण केले आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान सोमवारी दोन कार्यकर्त्यांनी दुपारी २ वाजल्यापासून क्रीडा संकुल परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे.
क्रीडा संकुलाची जागा ही खेळाडू आणि क्रीडा उपक्रमांसाठीच राखीव ठेवावी, अशी आंदोलकांची भूमिका आहे. मेळ्यासाठी या जागेचा वापर करण्यास दिलेली परवानगी तातडीने रद्द करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे. आंदोलनाची परवानगी मागण्यात आली असता ती नाकारण्यात आली होती. तरीही कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे.
दोन कार्यकर्ते आमरण उपोषणाला
या आंदोलनात निखिल चंद्रकिशोर मांडवकर (वय २३, रा. द्वारका नगरी, वरोरा) आणि आनंद वामनराव गेडाम (वय ३७, रा. दत्त मंदिर वार्ड, वरोरा) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
मेळ्यासाठी क्रीडा संकुलाची जागा देण्याची परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच १३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या मेळ्यासाठी नियमानुसार सहा दिवस आधी साहित्य आणण्याची परवानगी असताना ३१ ऑक्टोबरलाच साहित्य आणून १ नोव्हेंबरपासून काम सुरू करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. परवानगीच्या अटींचा भंग झाल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशीही मागणी आहे.
यापुढे क्रीडा संकुलाची जागा खेळाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणासाठी देण्यात येऊ नये, असा ठराव करून तो सार्वजनिक करावा. तसेच मेळ्यासाठी शासनाच्या आवश्यक परवानग्या घेतल्याशिवाय अन्य परिसरात परवानगी देऊ नये, अशा मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी
उपोषण शांततामय मार्गाने सुरू राहणार असून उपोषणकर्त्यांची दररोज आरोग्य तपासणी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय पथक नियुक्त करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक तथा नगरसेवक मनीष मुरली जेठानी यांनी केली आहे. उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या मागण्यांसंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि वरोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना पोलीस स्टेशन वरोराचे ठाणेदार यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
क्रीडा संकुलाच्या जागेचा वापर, मेळ्याला दिलेली परवानगी आणि परवानगीच्या अटींच्या पालनाबाबत निर्माण झालेला हा वाद आता आमरण उपोषणापर्यंत पोहोचला आहे. प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते, याकडे वरोरा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Back to top button