आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रयत्नांना यश,आष्टी आणि घोट स्वतंत्र तालुके होण्याचा मार्ग मोकळा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तालुका निर्मितीच्या मागणीला मान्यता; मंत्रालय प्रशासनाला लवकर कार्यवाहीचे निर्देश

उदय धकाते, गडचिरोली

चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून आष्टी आणि घोट या दोन स्वतंत्र तालुक्यांची निर्मिती करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आष्टी व घोट तालुका निर्मितीबाबत लवकर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्रालय प्रशासनाला दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आष्टी आणि घोट परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या स्वतंत्र तालुक्याच्या मागणीला आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी निवडून आल्यापासूनच चामोर्शी तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या, प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना करावा लागणारा प्रवास आणि ग्रामीण भागातील अडचणी लक्षात घेऊन तालुका विभाजनाचा विषय सातत्याने शासनदरबारी लावून धरला आहे. आष्टी आणि घोट या दोन्ही भागांतील नागरिकांना महसूल, पंचायत, कृषी, शिक्षण आणि अन्य शासकीय कामांसाठी चामोर्शी येथे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम खर्च होतात. स्वतंत्र तालुके निर्माण झाल्यास नागरिकांना प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी भूमिका आमदार नरोटे यांनी मांडली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत सात तासांच्या बैठकीत महत्त्वाचे विषय मार्गी

नागपूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पदयात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध प्रशासकीय बैठका घेऊन प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. यावेळी गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे जवळपास सात तास मुख्यमंत्र्यांसोबत होते. या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील प्रस्तावित एमआयडीसी आणि पोलाद प्रकल्पासाठी भूसंपादनाचा प्रश्नही यावेळी चर्चेला आला. बाधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या संमतीनेच भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. तसेच या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले.

याच बैठकीत आमदार डॉ. नरोटे यांनी चामोर्शी तालुक्याच्या विभाजनाचा विषय प्राधान्याने मांडला. आष्टी आणि घोट या दोन स्वतंत्र तालुक्यांची निर्मिती झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठा प्रशासकीय दिलासा मिळेल, तसेच स्थानिक विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित मंत्रालयीन प्रशासनाला लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

आष्टी-घोटच्या विकासाला मिळणार नवी दिशा?

स्वतंत्र तालुका निर्मितीमुळे महसूल व प्रशासकीय कामांसाठी नागरिकांची होणारी धावपळ कमी होण्यास मदत होऊ शकते. शासकीय कार्यालये, अधिकारी आणि विविध विभागांच्या सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. तसेच विकासकामांचे नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि स्थानिक प्रश्नांचे निराकरण अधिक प्रभावीपणे करता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

आष्टी आणि घोट परिसरातील नागरिकांकडून स्वतंत्र तालुक्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीसाठी स्थानिक पातळीवर विविध प्रयत्न आणि आंदोलनेही झाली आहेत. आता आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिल्याने या मागणीला शासनस्तरावर सकारात्मक दिशा मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मंत्रालयीन प्रशासनाकडून पुढील प्रक्रिया कधी सुरू होते आणि तालुका निर्मितीचा अधिकृत निर्णय कधी होतो, याकडे आष्टी, घोट आणि चामोर्शी तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आष्टी आणि घोट स्वतंत्र तालुके होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे चित्र आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker