गडचिरोली,प्रतिनिधी :-
गडचिरोली जिल्ह्यातील माओवादाची सद्यस्थिती, माओवादविरोधी अभियानाचा प्रवास आणि भविष्यातील आव्हाने यावर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दल व भारत सरकारच्या पत्र व माहिती कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे ‘माओवादमुक्त भारत’ या विषयावर पत्रकार वार्तालापाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान), नागपूर संदीप पाटील यांनी आभासी पद्धतीने सहभाग घेतला. पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, माओवाद विषयाचे अभ्यासक आणि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी माओवादाची उत्पत्ती, विस्तार, विचारसरणी, कार्यपद्धती, सद्यस्थिती आणि माओवादविरोधी अभियानादरम्यान आलेली आव्हाने यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. सशस्त्र माओवादाच्या अस्तानंतर पोलीस दलापुढील भविष्यातील आव्हानांबाबत संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ लेखक व पॉलिसी अॅनालिस्ट पी. व्ही. रामना आणि ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे यांनीही आपली अभ्यासपूर्ण निरीक्षणे व अनुभव मांडले.
माओवादविरोधी संघर्षात पोलीस दलाने स्वीकारलेल्या रणनीती, सुरक्षा यंत्रणांचे योगदान, स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विकासात्मक उपक्रमांच्या माध्यमातून माओवादाचा प्रभाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. माओवादाकडे केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून न पाहता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासात्मक दृष्टिकोनातूनही पाहण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
माओवादमुक्त गडचिरोलीच्या पुढील वाटचालीत पोलीस दल, शासन, माध्यमे आणि समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय व सकारात्मक संवाद महत्त्वाचा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. पत्रकारांनीही विविध प्रश्न उपस्थित करून चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला. या प्रसंगी माओवादविरोधी अभियानात प्राणांची आहुती देणाऱ्या २१४ शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., भारत सरकारच्या पत्र व माहिती कार्यालयाचे सौरभ खेकडे व देवप्रकाश दुबे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
Back to top button