आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

वनहक्क पट्ट्यांसाठी शेतकऱ्यांना न्याय द्या; अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडणार-डॉ. प्रणय खुणे यांचा इशारा

२०११-१२ पासून प्रलंबित प्रकरणांमुळे शेतकरी त्रस्त

गडचिरोली, प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात वनहक्क जमिनींचे दावे दाखल करूनही अनेक वर्षांपासून पट्ट्यांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने तातडीने न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी दिला आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (असो), नवी दिल्ली, जिल्हा गडचिरोलीच्या पुढाकाराने वनहक्क पट्ट्यांपासून वंचित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली, चक चापलवाडा, गोलबंद्री, मंजेगाव, किसाननगर आणि घोट येथील ११ शेतकऱ्यांनी वनहक्क पट्टे मिळण्याबाबत संघटनेकडे निवेदन सादर करून न्यायाची मागणी केली.

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे वनहक्क दाव्यांचे प्रकरण २०११-१२ पासून प्रलंबित असल्याचे संघटनेने म्हटले आहे. शासनाकडून वेळोवेळी त्रुटींची पूर्तता करण्याबाबत पत्रे मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही केली. मात्र, त्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून अंतिम निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचे वनहक्क पट्ट्यांचे प्रकरण अद्याप अधांतरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी संघटना आता आक्रमक भूमिका घेणार असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वनहक्क पट्ट्यांपासून वंचित शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांचा विराट मोर्चाही काढण्यात येईल, असे डॉ. खुणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, राणी गोपशेटवार, उपाध्यक्ष महेश विश्वास, संदीप भोवरे यांच्यासह विविध तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.

वर्षानुवर्षे कागदपत्रांची पूर्तता करूनही वनहक्क पट्ट्यांची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांमधील नाराजी वाढत आहे. प्रशासनाने या प्रकरणांची तातडीने पडताळणी करून पात्र दावेदारांना न्याय द्यावा, अन्यथा हा प्रश्न जिल्हास्तरीय आंदोलनाचे स्वरूप धारण करेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker