गडचिरोली, प्रतिनिधी :-
महिलांचे हक्क, सुरक्षितता, स्वाभिमान आणि आर्थिक स्वावलंबनासाठी महिला शक्तीने संघटित होऊन कार्य करावे, असे आवाहन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे यांनी केले. आरमोरी रोडवरील गणली समाज सभागृहात शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर होते.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे प्रश्न आणि सक्षमीकरणाला संघटनात्मक बळ देण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे. महिलांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवून त्यांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे नागवडे यांनी सांगितले.
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात महिलांसमोर शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची आव्हाने आहेत. सुरजागड प्रकल्पासह जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधींमध्ये स्थानिक महिलांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष रवींद्रभाऊ वासेकर यांनी महिला सक्षमीकरणाला पक्ष संघटनेच्या कार्यात प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. माजी मंत्री तथा आमदार राजेबाबा धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्ष संघटनेचे काम सुरू असून, महिलांना संघटनेत अधिक संधी देणे, त्यांच्या समस्या सोडविणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्याला वरिष्ठ उपाध्यक्ष पुष्पाताई भुरळे, देसाईगंज नगर परिषदेचे सभापती तथा तालुकाध्यक्ष पिंकूभाऊ बावणे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष नंदू नरोटे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधरभाऊ भरडकर, प्रदेश सचिव युनूस शेख, पुष्पाताई अलोणे, प्रा. रिंकू पापडकर यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांचे संघटन मजबूत करून त्यांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि स्वावलंबनासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
Back to top button