गडचिरोली, प्रतिनिधी :-
अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आठ आरोपींना गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) यांच्या संयुक्त पथकाने ३१ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. या कारवाईत २४०.५८० किलो गांजा, तीन चारचाकी वाहने आणि आठ मोबाईल असा एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस मदत केंद्र गट्टा (फु.) हद्दीत नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी छत्तीसगड पासिंगच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनाची तपासणी केली. वाहनातील तिघांच्या संशयास्पद हालचाली आणि विसंगत उत्तरे यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. यावेळी ते अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी पायलटिंग करत असल्याचे समोर आले.
त्यांच्या माहितीनुसार, मागून पिकअप वाहनातून आणखी तिघे अंमली पदार्थ घेऊन येत होते, तर बीड जिल्ह्यातील दोघे निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून अंमली पदार्थ खरेदी करण्यासाठी थांबले होते. पोलिसांनी तत्काळ हालचाली करून आठही जणांना ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून १२ पोत्यांमध्ये भरलेला गांजा आढळून आला.
१ कोटी २० लाखांचा गांजा जप्त
या कारवाईत १ कोटी २० लाख २९ हजार रुपये किमतीचा २४०.५८० किलो गांजा, ७ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन, ८ लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन, १० लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ आणि ८१ हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल असा एकूण १ कोटी ४६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी १ नोव्हेंबर २०२६ रोजी उपपोलीस ठाणे पेंढरी येथे एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे, पोलीस मदत केंद्र गट्टाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Back to top button