गडचिरोली, प्रतिनिधी :-
घोट क्षेत्रातील मंजेगाव, किसाननगर, मछली, चक चापलवाडा, हळदवाही, हळदवाही टोला, पेटतळा आणि भाडभीडी या गावांतील शेकडो शेतकरी अनेक वर्षांपासून शेतीच्या कायदेशीर पट्ट्यांपासून वंचित आहेत. सन १९५८ पासून प्रत्यक्ष शेतीची वहिवाट करीत असलेल्या या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर पट्टे मिळावेत, यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी पात्र शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे सकारात्मक आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
संबंधित गावांतील शेतकरी अनेक दशकांपासून जमिनीवर प्रत्यक्ष शेती करीत आहेत. त्यांच्या ताब्यात जुन्या अतिक्रमण पंजीसह शेतीच्या वहिवाटीशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र, भूमी अभिलेख विभागाकडे संबंधित शेती शिवाराची अधिकृत नोंदणी झालेली नसल्याने जमिनींचे गट क्रमांक अथवा सर्व्हे क्रमांक निश्चित झालेले नाहीत. परिणामी, कायदेशीर पट्टे आणि सातबारा उतारे नसल्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत.
या गंभीर प्रश्नावर डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर करून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी अस्मिता मोरे यांना चर्चेसाठी बोलावले. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून उपलब्ध कागदपत्रे व संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली. तसेच कागदपत्रांची पडताळणी, जमिनीची मोजणी आणि महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या प्रकरणाचा प्रशासनाकडून सकारात्मक विचार करण्यात येईल. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पट्टे मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
दरम्यान, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनीही शेतकऱ्यांच्या वतीने सविस्तर निवेदन सादर करून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, डॉ. प्रणय खुणे, भाजप नेत्या अनिता रॉय, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, उपाध्यक्ष किशोर कुंडू, पलास घरामी, माजी सरपंच रमेश लेकलवार, आनंदराव तुंकलवार, अंकित मोहुर्ले, रवींद्र गर्तूलवार, देविदास गर्तूलवार, बाबुराव बर्लावार, गिरीधर आलाम, योगेंद्र चौधरी, गजानन गर्तूलवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न मार्गी लागल्यास त्यांना कायदेशीर मालकी हक्कासोबतच शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्याचा मार्गही खुला होऊ शकतो. त्यामुळे आता प्रशासनाकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Back to top button