आपला जिल्हाताज्या घडामोडीसामाजीक

NCMC कार्ड तपासून सवलतीचे तिकीट रोखीने द्या

ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी; प्रभाकर कुबडे यांचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी :- 

राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक तसेच महिला लाभार्थ्यांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी कार्डमध्ये रक्कम उपलब्ध असणे बंधनकारक करण्याची अट ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी जाचक ठरत असल्याचे मत ज्येष्ठ नागरिक संस्था, तालुका गडचिरोलीचे सचिव प्रभाकर कुबडे यांनी व्यक्त केले आहे.

सवलतीचे तिकीट मिळण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, कार्डमध्ये रक्कम जमा असेल तरच सवलतीचे तिकीट देता येईल, ही अट नियमित प्रवास न करणाऱ्या ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांसाठी अडचणीची आहे. नियमित प्रवास नसताना कार्डमध्ये पैसे जमा करून ठेवणे म्हणजे त्यांच्या आर्थिक अडचणीत भर घालणारे असल्याचे कुबडे यांनी म्हटले आहे.

ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक अशिक्षित असून, त्यांना NCMC कार्डमध्ये रक्कम जमा करण्यासाठी ऑनलाइन व्यवहाराची प्रक्रिया स्वतः करता येत नाही. त्यामुळे त्यांना इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते. परिणामी आर्थिक व्यवहारासोबतच त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी ज्येष्ठ नागरिक किंवा पात्र महिला लाभार्थी प्रवास करताना वयाचा किंवा पात्रतेचा पुरावा तपासून रोख रक्कम स्वीकारून सवलतीचे तिकीट देण्यात येत होते. त्याच धर्तीवर आता प्रवाशाचे NCMC कार्ड तपासून त्याची सवलतीसाठी पात्रता निश्चित करावी आणि रोख रक्कम स्वीकारून सवलतीचे तिकीट देण्याची सुविधा सुरू ठेवावी, अशी मागणी प्रभाकर कुबडे यांनी केली आहे.

NCMC कार्डची सुविधा कायम ठेवतानाच रोखीने सवलतीचे तिकीट देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक व महिला लाभार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होईल. त्यामुळे एस.टी. महामंडळाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker