आपला जिल्हाताज्या घडामोडी
कोटगल बॅरेजच्या भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक?
कुठे ६ ते ७ लाख रुपये, तर काहींच्या जमिनींचे लाखोंचे मूल्यांकन; पूर्वी २५ लाखांचा दर दिल्याचा शेतकऱ्यांचा दावा

गडचिरोली, प्रतिनिधी :-
कोटगल बॅरेज प्रकल्पासाठी अडपल्ली व गोगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींच्या भूसंपादनासाठी करण्यात आलेल्या मूल्यांकनावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प मूल्यांकन करून शासनाकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गोगाव परिसरातील केवळ दोन-तीन व्यक्तींच्या जमिनींचे मूल्यांकन तुलनेने मोठ्या प्रमाणात करण्यात आले असून, इतर अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे मूल्यांकन केवळ ६ ते ७ लाख रुपये प्रति एकर इतके दाखविण्यात आले आहे. तर अडपल्ली परिसरातील जमिनींसाठी १४ ते १५ लाख रुपये प्रति एकर मूल्यांकन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, सध्या अडपल्ली-गोगाव परिसरात शेतीजमिनींचा बाजारभाव किमान २० लाख रुपये प्रति एकर किंवा त्याहून अधिक असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत शासन यंत्रणेकडून करण्यात आलेले कमी मूल्यांकन हे शेतकऱ्यांच्या हिताला बाधक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पूर्वी २५ लाख रुपये प्रति एकर दिल्याचा दावा
अडपल्ली-गोगाव परिसरातीलच जमीन यापूर्वी गोंडवाना विद्यापीठ तसेच रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करताना सुमारे २५ लाख रुपये प्रति एकर दराने मोबदला देण्यात आला होता, असा दावा बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. त्याच परिसरातील जमिनींसाठी आता केवळ ६ ते ७ लाख रुपये प्रति एकर मूल्यांकन कसे करण्यात आले, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.




