अपघातक्राईमताज्या घडामोडी
पोर्ला अपघातप्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दोघांवर आयसीयूमध्ये उपचार

गडचिरोली, प्रतिनिधी :-
पोर्ला येथे एसटी बस आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरधाव व निष्काळजीपणे बस चालविताना चालकाने आपली लेन सोडून समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जखमी झाले असून, त्यापैकी दोघांवर नागपूर येथील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
२५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजता नागपूर येथील हिना इमरान शेख (३४), त्यांचे पती इमरान मुमताज शेख (३९), मुलगा अरहान इमरान शेख (१०) आणि जखिया मुमताज शेख (५९) हे टाटा कर्व्ह कार क्रमांक एमएच-३१-जीए-७८६३ने नागपूरहून गडचिरोलीकडे येत होते.
पोर्ला येथील पेट्रोल पंपासमोर अपघात
पोर्ला गावाजवळील पेट्रोल पंपासमोर त्यांची कार आली असता समोरून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक एमएच-१४-एलएक्स-५५९५ने कारला जोरदार धडक दिली. तक्रारीनुसार, बसचालक बस भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. त्याने वाहनाची लेन सोडून दुसऱ्या बाजूला जात कारला धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या धडकेत कारमधील चौघेही जखमी झाले. अपघातानंतर दहा वर्षीय अरहान याने इमरान शेख यांचे मामा मुस्ताख शेख यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुस्ताख शेख घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना कारमधून बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले.



