गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली तालुक्यात मागील दोन वर्षांपासून रानटी हत्तींचा वावर सुरू असून, सुरुवातीला सुमारे २४ असलेली हत्तींची संख्या आता ३७ ते ३८ पर्यंत पोहोचल्याचा दावा गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केला आहे. सध्या हे हत्ती नवरगाव, कोळणा, काटली परिसरात वास्तव्यास असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
रानटी हत्तींना इतरत्र वळविण्यासाठी वनविभागाकडून ‘हुल्ला गॅंग’ची मदत घेतली जात आहे. यापूर्वी हुल्ला गॅंगमधील १० सदस्य आणि स्थानिक ५ ते ६ नागरिक, अशी सुमारे १५ ते १६ जणांची टीम कार्यरत होती. मात्र, सध्या हुल्ला गॅंगचे केवळ दोन आणि स्थानिक तीन, असे एकूण पाच जण कार्यरत असल्याचे दशमुखे यांनी म्हटले आहे.
हत्तींची संख्या वाढलेली असताना मनुष्यबळ कमी झाल्यामुळे रानटी हत्तींना सुरक्षितपणे इतरत्र वळविण्याच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हत्तींच्या वाढत्या संख्येचा विचार करून हुल्ला गॅंगची २० ते २५ जणांची स्वतंत्र टीम तातडीने कार्यरत करावी, अशी मागणी विलास दशमुखे यांनी केली आहे.
तसेच हुल्ला गॅंगमधील सदस्य आणि या कामासाठी सहकार्य करणाऱ्या स्थानिक नागरिकांना नियमितपणे दरमहा वेतन देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. हत्तींचा मानवी वस्तीत प्रवेश होऊन संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रभावी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे दशमुखे यांनी नमूद केले.
Back to top button