क्राईमताज्या घडामोडी

क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची उकल; आरोपीला गडचिरोली पोलिसांकडून अटक

मृतदेहावरील जखमांच्या बारकाईने निरीक्षणातून तपासाला मिळाली दिशा; तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद

गडचिरोली, प्रतिनिधी :-

चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर येथे महिलेचा खून झाल्याच्या अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याची उकल करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. तपासातील बारकावे, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संदीप रावजी टेकाम (३५), रा. नारायणपूर चक नं. २, ता. चामोर्शी याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोमकें घोट येथील तपास पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

शेतात आढळला महिलेचा मृतदेह

५ सप्टेंबर २०२६ रोजी नारायणपूर येथील गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड (६०) या शेतात गेल्या होत्या. मात्र सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला असता शेतात त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला.

याप्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४६०/२०२६, कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

जखमांच्या निरीक्षणातून तपासाला नवी दिशा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली. पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार करण्यात आली.

सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली पोमकें घोट आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला. सुरुवातीला ठोस पुरावे उपलब्ध नसताना मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. जखमांच्या स्वरूपावरून आरोपी डावखुरा असण्याची शक्यता तपासात गृहीत धरण्यात आली. त्यानंतर तपासाची दिशा निश्चित करून पोलिसांनी मयत महिलेचे कौटुंबिक संबंध, तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.

जुन्या वादातून खून केल्याचा पोलिसांचा दावा

तपासादरम्यान संदीप टेकाम याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्य आणि जुन्या वादातून गोपीकाबाई गायकवाड यांच्यावर काठीने मारहाण करून त्यानंतर दगडाने ठेचून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

यानंतर २९ सप्टेंबर २०२६ रोजी संदीप टेकाम याला अटक करण्यात आली. त्याला चामोर्शी येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे करीत आहेत.

संयुक्त पथकाची कामगिरी

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत, सपोनि. आगलावे, पोमकें घोटचे सपोनि. कल्पेश खारोडे, पोलीस ठाणे रेगडीचे सपोनि. गवळी, स्थागुशाचे पोउपनि. विश्वा कराळे यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी तपासात सहभाग घेतला.

क्लिष्ट स्वरूपाच्या या गुन्ह्यात तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करून त्याला अटक करण्यात आल्याबद्दल पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker