गडचिरोली, प्रतिनिधी :-
जिल्ह्यात रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत घट झाली असली, तरी एकूण अपघातांची वाढलेली संख्या आणि दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता अपघात प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत रस्ते अपघातांची आकडेवारी, रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल, राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामे आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासोबतच अपघातांची कारणे शोधून त्यावर आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता तथा रस्ता सुरक्षा समितीच्या सचिव सोनाल चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरणे मोरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अपघात वाढले, मात्र मृत्यूंमध्ये घट
बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यात १७७ रस्ते अपघातांत १४६ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत २१० अपघातांत ९७ जणांचा मृत्यू झाला. तुलनात्मक कालावधीत मृत्यूंच्या संख्येत ३३.५६ टक्के घट झाली असली, तरी अपघातांची संख्या वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यंदाच्या ९७ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू दुचाकीस्वारांचे असून हे प्रमाण सुमारे ६१ टक्के आहे. त्यामुळे हेल्मेट वापराच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच अतिवेगाने आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
अपघात झाल्यानंतर केवळ गुन्हा नोंदविण्यापुरते मर्यादित न राहता रस्त्याची स्थिती, वाहनांचा वेग आणि अपघातामागील अन्य कारणांचा सखोल अभ्यास करावा, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.
रस्तेदुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश
राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख रस्त्यांवरील कामांच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गडचिरोली–आरमोरी, चामोर्शी, धानोरा तसेच आष्टी–आलापल्ली–सिरोंचा मार्गांवरील खड्डे बुजविणे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
रस्त्यांची नियमित देखभाल न करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात केवळ नोटिसा बजावण्यापुरती कारवाई न करता नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी. आवश्यकतेनुसार संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
शहरातील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई
गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी इंदिरा गांधी चौकाची विहित मानकांनुसार पुनर्रचना करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आठवडी बाजार परिसर, फळ व भाजीविक्रेत्यांची ठिकाणे तसेच दुकानांसमोरील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.
जिल्हा रस्ता सुरक्षा निधी आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या (डीएमएफ) निधीतून वाहतूक सिग्नल, गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे, रुग्णवाहिका तसेच अंगावर परिधान करण्याचे कॅमेरे उपलब्ध करण्यासंदर्भातील प्रस्ताव व कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
बसथांब्यांबाबतही प्रशासनाचे निर्देश
एसटी आणि खासगी बसगाड्यांनी शहरात अनधिकृत ठिकाणी थांबू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. वाहनांचा वेग मर्यादेत ठेवण्यासाठी वेगनियंत्रक उपकरणांची कार्यस्थिती तपासावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर नियमानुसार कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघात कमी करण्यासोबतच रस्त्यांची स्थिती, वाहतूक शिस्त आणि शहरातील अतिक्रमण या तिन्ही बाबींवर समन्वयाने कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
Back to top button