आपला जिल्हाताज्या घडामोडी
आष्टीतील प्रस्तावित बेमुदत उपोषणाला आजाद समाज पक्षाचा विरोध
प्रशासनाकडे परवानगी नाकारण्याची मागणी

आष्टी(गडचिरोली), प्रतिनिधी :-
सुरजागड प्रकल्पाच्या वाहतुकीच्या प्रश्नावरून आल्लापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आष्टी येथे १ ऑक्टोबर २०२६ पासून प्रस्तावित करण्यात आलेल्या बेमुदत उपोषणाला आजाद समाज पार्टीने स्पष्ट विरोध केला आहे. आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलनास परवानगी देऊ नये, अशी मागणी पक्षाच्या वतीने तहसीलदार, चामोर्शी यांच्याकडे करण्यात आली आहे.
आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. संबंधित ट्रान्सपोर्ट असोसिएशन अहेरी तालुक्यातील असून, त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करायचे असल्यास ते त्यांच्या कार्यक्षेत्रात म्हणजे अहेरी तालुक्यात करण्यात यावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
आंबेडकर चौकातील आंदोलनाला विरोध

आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा नागरिकांची दैनंदिन वर्दळ आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा परिसर असल्याने येथे बेमुदत उपोषण झाल्यास वाहतूक व्यवस्था, नागरिकांची दैनंदिन कामे तसेच परिसरातील शांतता व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आजाद समाज पार्टीने निवेदनात नमूद केले आहे.
प्रशासनाने आंदोलनास परवानगी दिल्यास आष्टीतील नागरिकांना शांतता, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
पोलिसांच्या अभिप्रायातही कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा
दरम्यान, आष्टी पोलीस ठाण्याने प्रस्तावित आंदोलनाबाबत कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे अभिप्राय सादर केला आहे. पोलिसांनी स्थळ पाहणी व चौकशी केल्याचे नमूद करताना आंदोलनासाठी प्रस्तावित जागा खासगी असून तेथे बांधकाम सुरू असल्याचे तसेच ती जागा राज्य महामार्ग ३५३ सी लगत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गर्दी झाल्यास अपघाताची शक्यता असल्याचे पोलिसांच्या अभिप्रायात म्हटले आहे.
तसेच आंदोलनादरम्यान सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी, अशा अटी पोलिसांनी नमूद केल्या आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागू असल्याचाही अभिप्रायात उल्लेख आहे.
परवानगीबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष




