गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली पोलिसांची विशेष मोहीम; ६ अग्निशस्त्रांसह जिवंत काडतुसे, डेटोनेटर व वॉकीटॉकी हस्तगत
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेले अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केले. ६ ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात ६ अग्निशस्त्रांसह जिवंत काडतुसे, डेटोनेटर, केबल वायर, मॅगझिन तसेच वॉकीटॉकी असा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला.
पोलीस दलाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर्शी जंगल परिसरात विशेष अभियान राबविण्यात आले. यासाठी प्राणहिता येथील विशेष अभियान पथकाच्या पाच तुकड्या तसेच बीडीडीएसच्या दोन पथकांना शोधमोहीमेसाठी रवाना करण्यात आले होते.
जंगल परिसराला घेराव घालून बीडीडीएसच्या जवानांनी कसून तपासणी केली असता लपवून ठेवलेले साहित्य आढळून आले. त्यामध्ये एक .303 रायफल, दोन सिंगल शॉट रायफल, दोन गावठी पिस्तूल आणि एक बीजीएल लाँचर अशा एकूण सहा अग्निशस्त्रांचा समावेश आहे.
याशिवाय १० बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे, ७ डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर, दोन मॅगझिन, दोन कुकर, तीन वॉकीटॉकी, तीन वॉकीटॉकी चार्जर आणि दोन वॉकीटॉकी बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या. इतर माओवादी साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, प्राणहिता, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी केली.
Back to top button