गडचिरोली, प्रतिनिधी :-
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आरमोरी रोडवरील सुमानंद सभागृहात आयोजित ‘युवा संवाद व विकसित भारत निबंध स्पर्धा’ उत्साहात पार पडली. युवकांमध्ये राष्ट्रनिर्मितीची भावना, वैचारिक जागरूकता आणि लेखनकौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
‘विकसित भारत’ हा निबंध स्पर्धेचा विषय असून, १६ ते २१ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ६०० ते ८०० शब्दांत निबंध लेखनाचे आवाहन करण्यात आले होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक १५ हजार रुपये आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्याकडून, तर तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्याकडून देण्यात येणार आहे.
विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण – डॉ. अशोक नेते
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प देशासमोर ठेवला आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रांत भारताला जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेणे हे या संकल्पनेचे उद्दिष्ट आहे.
या संकल्पपूर्तीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांमध्ये शिक्षण, कौशल्य, संशोधन, नवकल्पना, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली, तर देशाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल. समाजातील गरीब, दलित, शोषित, पीडित, वंचित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
भाजपा युवा मोर्चा युवकांना संघटित करून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करण्याचे काम करीत आहे. ‘विकसित भारत’ या विषयावरील निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळेल आणि भविष्यातील सक्षम नेतृत्व घडण्यास मदत होईल, असा विश्वासही डॉ. नेते यांनी व्यक्त केला.
प्रत्येक तालुक्यात अशा स्पर्धा व्हाव्यात – आमदार डॉ. मिलिंद नरोटे
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ‘विकसित भारत’ विषयावरील निबंध स्पर्धा ही विचारप्रवर्तक संकल्पना असल्याचे सांगितले. अशा स्पर्धांमुळे युवकांना देशाच्या भविष्याचा विचार करण्याची आणि राष्ट्राच्या विकासातील आपली भूमिका लेखनातून व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा स्पर्धा केवळ जिल्हास्तरावर मर्यादित न राहता गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या मंचावर आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सदानंद कुथे, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे महामंत्री बादल राऊत, प्रदेश सचिव अमेय विश्वरूप, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, जिल्हा महामंत्री आकाश सातपुते आणि भाजयुमो शहराध्यक्ष साई सिल्लमवार आदी उपस्थित होते. याशिवाय भाजपाचे विविध पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांच्या विचारशक्तीला चालना देणारा, लेखनकौशल्य विकसित करणारा आणि २०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पनेशी नव्या पिढीला जोडणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Back to top button