गडचिरोली, प्रतिनिधी :-
विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. यावेळी चारा लागवड, नाला खोलीकरण, अंगणवाडी बांधकाम, कॅटल शेल्टर, बोडी दुरुस्ती आदी कामांच्या प्रगतीचा आढावा घेऊन संबंधित विभागांनी समन्वयातून कामांना गती द्यावी, तसेच मजुरांसाठी हजेरी प्रक्रिया सुलभ करावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
विशेषतः धानोरा तालुक्यातील राजोलीसारख्या दुर्गम व दुर्लक्षित गावांमध्ये स्थानिक गरजांचा विचार करून कामांचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. या भागातील नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
अभियानांतर्गत ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती बरोबरच स्थानिक पातळीवर आवश्यक पायाभूत व विकासकामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. विविध विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या आढावा बैठकीला भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलासजी भांडेकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती बेलपत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हिवंज, उपवनसंरक्षक (प्रादेशिक व सामाजिक वनीकरण), सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता (सिंचन) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण विकासाला गती देतानाच स्थानिक नागरिकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
Back to top button