गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोलीतील प्रस्तावित विमानतळासाठी सुरू असलेली भूसंपादनाची कार्यवाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सध्या स्थगित ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पालकर यांनी राखी–गुरवळा येथील उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनासंदर्भातील १२ मे २०२६ रोजीचा शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी गुरवळा–राखी–हिरापूर–शिरपूर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने २ ऑक्टोबर २०२६ पासून राखी–गुरवळा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे.
या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरही त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंतची पुढील भूसंपादन कार्यवाही थांबविण्यात आली आहे, अशी माहिती अनिरुद्ध पालकर यांनी दिली. शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने संपादित करून प्रकल्प राबविण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्देश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रश्नावर चर्चेतून अन्य मार्ग निघू शकतो. चर्चेअंती शेतकऱ्यांचे समाधान न झाल्यास त्यांना पुन्हा आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित राहील, असेही पालकर यांनी सांगितले.
विमानतळासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध
राखी, गुरवळा, हिरापूर आणि शिरपूर परिसरातील जमीन सुपीक व बारमाही बागायती आहे. या भागातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे विमानतळासाठी जमीन देण्यास आपला विरोध असल्याचे ग्रामस्थांनी पालकर यांच्याशी संवादादरम्यान स्पष्ट केले.
यावेळी तहसीलदार सागर कांबळे, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
भूसंपादनाची कार्यवाही स्थगित ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समिती उपोषणाबाबत काय निर्णय घेते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Back to top button