गडचिरोली, प्रतिनिधी :-
केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यातील नवेगावने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील पाच गावांमध्ये आयोजित सौर ऊर्जा स्पर्धेत सर्वाधिक क्षमता स्थापित करून नवेगावने जिल्ह्यातील पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ होण्याचा मान मिळविला आहे. गावातील १०५ वीज ग्राहकांनी घरांच्या छतांवर एकूण ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत.
नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत मॉडेल सोलर व्हिलेज विकसित करण्यासाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधून गडचिरोली जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली व कुनघाडा, चामोर्शी तालुक्यातील आष्टी, गडचिरोली तालुक्यातील नवेगाव आणि वडसा तालुक्यातील कुरूड या गावांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या गावांची निवड केली होती. १७ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात आली. गावागावांत अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे आणि नागरिकांना घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
१०५ घरांवर सौर प्रकल्पांची उभारणी
स्पर्धेच्या कालावधीत नवेगावमधील १०५ वीज ग्राहकांनी एकूण ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित केले. इतर चार गावांच्या तुलनेत सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता उभारल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नवेगावची मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड केली.
गावाच्या विकासासाठी एक कोटींचे अनुदान
मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड झाल्यामुळे नवेगावला केंद्र शासनाच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या निधीतून गावातील शासकीय व निमशासकीय इमारतींवरही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने १७ ठिकाणी एकूण १०६ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ६३.१२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुढील कार्यवाहीसाठी हे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे.
इतर गावांसाठी ठरणार प्रेरणादायी
घरगुती सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून नवेगावने मिळविलेले यश जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सौर ऊर्जेच्या वापरामुळे पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होण्यास, वीज खर्चात बचत होण्यास आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. आता सार्वजनिक इमारतींवरही सौर प्रकल्प उभारले जाणार असल्याने नवेगाव अक्षय ऊर्जा वापराच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे.
Back to top button