गडचिरोली, प्रतिनिधी :-
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केलेले आरोप खोटे, निराधार व बिनबुडाचे असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनासारख्या अत्यंत संवेदनशील विषयाचा राजकीय स्वार्थ आणि प्रसिद्धीसाठी वापर करणे चुकीचे असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अजितदादा पवार यांचे अपघाती निधन ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, ही पक्षाची आणि महायुती सरकारची ठाम भूमिका आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी, डीजीसीए तसेच संबंधित केंद्रीय यंत्रणांमार्फत कायदेशीर प्रक्रियेनुसार सुरू असल्याचे वासेकर यांनी सांगितले.
कोणताही ठोस पुरावा नसताना एखाद्या समारंभातील किंवा कौटुंबिक कार्यक्रमातील जुना फोटो दाखवून राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित विमान कंपनीची सेवा २०१३ पासून देशातील व राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रशासन घेत आले आहेत. एखाद्याच्या लग्नसमारंभाला उपस्थित राहणे हा सामाजिक शिष्टाचाराचा भाग असताना त्याला गुन्हेगारी किंवा कटकारस्थानाचा रंग देणे हे खालच्या पातळीचे राजकारण असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या पुतळ्याच्या अनावरणासारख्या भावनिक आणि महत्त्वाच्या दिवशी माध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठी रोहित पवार यांनी राजकीय स्टंट केल्याचा आरोप वासेकर यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही बिनबुडाचे आरोप करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुती सरकार राज्याच्या विकासासाठी तसेच गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. मात्र, विरोधकांकडून खोटे नॅरेटिव्ह तयार करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी दिला.
पत्रकार परिषद ला रवींद्र वासेकर, पापडकर, माजी नगराध्यक्ष प्रमोद वैद्य, कार्याध्यक्ष नंदू नरोटे, पिंकू बावणे आदी उपस्थित होते.यांनीही भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
Back to top button