आपला जिल्हाताज्या घडामोडीसाहित्यिक

गडचिरोलीत २९ नोव्हेंबरला ‘जनता अवेक इंडिया’ संमेलन

गडचिरोली, प्रतिनिधी :-

आदिवासी, अनुसूचित जाती, ओबीसी, अल्पसंख्याक, भटके-विमुक्त आणि तमाम बहुजन समाजाच्या संवैधानिक प्रश्नांवर व्यापक संवाद घडवून आणण्यासाठी लोकसंघ–सोशल एज्युकेशन मुव्हमेंट (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथे प्रथम राज्यस्तरीय ‘जनता अवेक इंडिया’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पोटेगाव रोडवरील यमुना लॉन येथे होणाऱ्या या संमेलनात राज्यातील विविध भागांतील सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी, लेखक, विचारवंत आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या संमेलनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या ‘जनता’ वृत्तपत्राच्या वैचारिक परंपरेचा संदर्भ आहे. लोकसंघ गेल्या १३ वर्षांपासून ‘अवेक इंडिया’ हे नियतकालिक प्रकाशित करीत असून, सामाजिक प्रश्नांवर वैचारिक संवाद, सामूहिक विचार आणि कृतीला चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे.

लोकसंघ–सोशल एज्युकेशन मुव्हमेंटची स्थापना २०१० मध्ये झाली. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारधारेतून प्रेरणा घेऊन सामाजिक शिक्षण, संवैधानिक जागृती, सामूहिक नेतृत्व आणि लोकसंघटनेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी संघटना कार्यरत आहे.

भारतीय संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये प्रत्यक्षात सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचली आहेत का, यावर संमेलनात विचारमंथन होणार आहे. विशेषतः आदिवासी समाजाचे शिक्षण, आरोग्य, जल-जंगल-जमीन, मातृभाषा, संस्कृती, प्रतिनिधित्व, रोजगार आणि आर्थिक संसाधनांशी संबंधित प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

विचारमंथनासह शाहीरी जलसा आणि युवा संवाद

संमेलनात वैचारिक सत्रांसोबत ‘जागर समतेचा’ शाहीरी जलसा, आदिवासी युवा संवाद आणि मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रसिद्ध रॅपर विपिन तातड आपल्या चमूसह सांस्कृतिक सादरीकरण करणार आहेत. यातून वंचित समाजघटकांचा इतिहास, संघर्ष, सांस्कृतिक वारसा आणि फुले-शाहू-बिरसा-आंबेडकर यांचे विचार मांडले जाणार आहेत.

संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जितेंद्र मीणा, दशरथ मडावी, ॲड. प्रियदर्शी तेलंग, प्रशांत रणदिवे, डॉ. संतोष सुरडकर आणि संदीप तंडोलकर उपस्थित राहणार आहेत. आदिवासी युवा संवादात तनुज पेंदोर आणि साधना मडावी सहभागी होतील. संमेलनाचे अध्यक्षपद ॲड. बोधी रामटेके भूषविणार आहेत.

विविध सुविधा आणि दहा मान्यवरांचा गौरव

संमेलनस्थळी मोफत कायदेविषयक मार्गदर्शन, उच्च शिक्षणविषयक माहिती आणि वनहक्क पट्ट्यांसंदर्भात मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय पुस्तकविक्री, बांबू हस्तकला, पारंपरिक वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही लावण्यात येणार आहेत. समाजपरिवर्तनाच्या विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या दहा मान्यवरांना ‘जनता अवेक इंडिया पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

पत्रकार, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींसाठी स्वतंत्र मीडिया पॉइंटची व्यवस्था करण्यात आली आहे. यामाध्यमातून सामाजिक प्रश्नांवर चर्चा, मुलाखती आणि संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या राज्यस्तरीय संमेलनात लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, विद्यार्थी, कामगार, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने शाम रामटेके, धर्मानंद मेश्राम, देवेंद्र सोनपिपरे, विनोद मडावी, ॲड. नभा शेंडे, राज बन्सोड, ऐश्वर्या खंडागळे, सुरेंद्र वासनिक, सुधा चौधरी, अलका गुरनुले, वामनराव गुरनुले, मोहन मोटघरे, देवेंद्र मेश्राम, प्रतीक डांगे, सतीश दुर्गमवार आदींनी केले आहे.

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker