गडचिरोली, प्रतिनिधी :-
लोकनेते आदिवासी रत्न बाबुरावजी मडावी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवोदित आदिवासी साहित्य परिषदेच्या पाचव्या साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथे करण्यात आले आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली आणि क्रांतिवीर नारायणसिंग उईके विकास समिती, ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण कार्यालय, एल.आय.सी. रोड, आयटीआय चौक, गडचिरोली येथे हा कार्यक्रम होणार आहे.अशी माहिती गडचिरोली येथे पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली.
संमेलनानिमित्त सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आयटीआय चौक ते कार्यक्रमस्थळापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा होईल. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे सहउद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनाध्यक्ष म्हणून पालघर जिल्ह्यातील वसई येथील ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक प्रा. डॉ. सखाराम डाखोरे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश बाबुराव मडावी, तसेच समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कुसुमताई आलाम या बीजभाषक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
पहिल्या सत्रात लोकनेते बाबुरावजी मडावी यांच्या सामाजिक, साहित्यिक, राजकीय व लोकउपयोगी योगदानावर विचारमंथन होणार आहे. दुसऱ्या सत्रात आदिवासींच्या मातृभाषा, मौखिक साहित्याचे संवर्धन व चिकित्सा या विषयावर साहित्यिक आणि अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत. या सत्रांच्या अध्यक्षस्थानी अनुक्रमे साहित्यिक डॉ. संजया लोहकरे आणि प्रा. डॉ. राम वासेकर राहणार आहेत. विविध मान्यवर वक्ते या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी ४ ते ६ या वेळेत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नीलकांत कुलसंगे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये विविध कवी सहभागी होऊन आपल्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत.
संमेलनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे साहित्य, संस्कृती, भाषा, सामाजिक योगदान आणि वैचारिक परंपरेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमी, आदिवासी बांधव, साहित्यिक, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषद ला कवियित्री कुसुमताई अलाम, डॉ. प्रवीण किलनाके, आशा वेलादी, निशा गेडाम, मंजु आत्राम, प्रमिला रामटेके, सुनीता उसेंडी, प्रियदर्शन मडावी, प्रा. अनिल होळी आदि उपस्थित होते.
Back to top button