आरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे माता-बाळाचा मृत्यू

दोषींवर कठोर कारवाईची आजाद समाज पार्टीची मागणी

चामोर्शी, प्रतिनिधी :-

चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या जिजा हंसराज सातार (वय २७) आणि त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.

दि. २३ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता जिजा सातार यांना प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसूतीची वेळ पूर्ण झालेली असतानाही दाखल केल्यानंतर काही तास योग्य वैद्यकीय उपचार मिळाले नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

परिस्थिती गंभीर झाल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णाला रेफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, रेफर करण्यात कथित विलंब झाल्यामुळे नवजात बाळाचा रस्त्यातच मृत्यू झाला, तर मातेलाही पुढील उपचारादरम्यान वाचवता आले नाही, असा आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे.

वैद्यकीय अधीक्षकांच्या उपस्थितीवरही प्रश्न

कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, सकाळी ५ वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतर बराच वेळ संबंधित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर नर्सने वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून बोलावल्याचेही सांगण्यात आले.

वेळेत सीझेरियन किंवा आवश्यक वैद्यकीय उपचार झाले असते तर माता-बाळाचे प्राण वाचू शकले असते का? याची तज्ज्ञ वैद्यकीय समितीमार्फत तपासणी करण्याची मागणी पक्षाने केली आहे.

सोनोग्राफी सुविधेबाबतही प्रश्न

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी सुविधेबाबतही आजाद समाज पार्टीने गंभीर आरोप केले आहेत. शासकीय रुग्णालयातील रुग्णांना खासगी ठिकाणी सोनोग्राफीसाठी पाठविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी सुविधा नियमित उपलब्ध नसल्याचा दावाही पक्षाने केला.

या आरोपांबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची भेट घेऊन चौकशी व कारवाईची मागणी केली. संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

‘चौकशीच्या नावाखाली प्रकरण दडपता कामा नये’

माता आणि नवजात बाळाचा मृत्यू ही अत्यंत गंभीर बाब असून, केवळ चौकशीचे आश्वासन देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास आजाद समाज पार्टी शांत बसणार नाही, असा इशारा देण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी, उपचारातील विलंबाची जबाबदारी निश्चित करणे, संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करणे तसेच दोष सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करावी. याशिवाय पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली आहे.

महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]

महाभारत न्यूज

उदय धकाते,संपादक

Related Articles

Leave a Reply

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker