ताज्या घडामोडीसामाजीक
वाढदिवसाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
इंजि. जान्हवी चन्नावार यांचा प्रेरणादायी उपक्रम

गडचिरोली, प्रतिनिधी :-
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते प्रविण चन्नावार यांच्या कन्या इंजिनिअर जान्हवी प्रविण चन्नावार यांच्या वाढदिवसानिमित्त मवेली येथील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. वाढदिवसाच्या निमित्ताने केक, पार्ट्या आणि अनावश्यक खर्च करण्याऐवजी तोच पैसा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
‘शिक्षण हेच सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रभावी माध्यम आहे’ या विचारातून चन्नावार कुटुंबीयांकडून दरवर्षी वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. यावर्षीही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती केशव पुडो, पोलिस पाटील शिवाजी मठामी, लालाजी मठामी, मनोज मतामी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जोगेंदर कुजूर, मनीष टोपो, आकाश मतामी, सोमेश्वर येलपुलवार, अंगणवाडी सेविका निता येलपुलवार, पर्यवेक्षिका दुर्वा मॅडम, आरोग्यसेविका संगीता उसेंडी, आरोग्यसेवक राणा, सुरज मतामी, रविंद्र मतामी, संदीप कुजूर यांच्यासह नागरिक व महिलांची उपस्थिती होती.
‘आनंद स्वतःपुरता न ठेवता तो गरजूंसोबत वाटला, तर त्याचे समाधान अनेकपटीने वाढते’, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जान्हवी चन्नावार यांच्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल पुडो यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन संजय मटामी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल मतामी, जनी घीसू मटटामी, करिष्मा मतामी, माधुरी मतामी यांच्यासह अन्य नागरिकांनी सहकार्य केले.
महाभारत न्यूज चे वाचकांना आवाहन [totalpoll id="3140"]



